त्या वळणावर - भाग 9

त्या वळणावर

भाग #9

मुक्ता स्वत:शीच हसत आहे हे पाहुन डाँ.अभिषेकला जरा आश्चर्य वाटलं.त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते.पण अभिषेकने घड्याळात पाहिले तर चार वाजत आले होते.नेमके आज त्याला एका महत्वाच्या मिटिंगसाठी हजर रहाणे गरजेचे होते.अभिषेक हा विचार करतच होता तेवढ्यात त्याला काँल आला.त्यामुळे तो मुक्ताला म्हणाला,"खरंतर आज आपण एका अश्या वळणावर येऊन उभे आहोत की मला तुझ्या माझ्याविषयीच्या भावना जाणुन घ्यायच्या आहेत पण मला निघावं लागेल.कारण माझी एक अत्यंत महत्वाची मिटिंग आहे.उद्या नक्की भेटुयात...चालेल...?"
हे ऐकुन मुक्ताने हो म्हणत मान हलवली.तिच्या मनातले वादळ बरयापैकी शमले होते.मनातलं सगळं सांगितलं म्हणुन आता तिला खुपच हलकं वाटत होतं.पण मनाला शांती वाटत नव्हती.तिला अजुन बरंच काही बोलावसं वाटत होत पण अभिषेकला घाई असल्यामुळे ती गप्प होती.अभिषेकचा प्रश्न बरोबर होता,त्याला उत्तर अपेक्षित होते.तिच्या मनात हे विचारचक्र सुरु होते.तिच्या चेहरयावरचे बदलते भाव बघुन अभिषेकने लगेच विचारले,"काही प्राँब्लेम आहे का? थोडावेळ बोलुयात का? हवे तर मी मिटिंग रद्द करु शकतो..."
ती लगेच नाही म्हणाली व पुढच्या क्षणी काही न बोलता उठुन निघुन गेली.अभिषेक बघत राहिला.पण त्याने तिला आवाज दिला नाही.तिने आजवर जितके काही मनाने सांगितले ते कमी नव्हते.तिला तिची स्पेस देणे महत्वाचे होते.
अभिषेक तिला आवाज न देता गाडीकडे वळला.त्यानंतरचे तीन तास तो मात्र अतिशय बिझीच होता.पण मधेच त्याला मुक्ताची आठवण येऊन गेली.पण त्याला विचार करायला वेळच नव्हता.तिचा विचार बाजुला करुन तो प्रेझेंटेशन पहात होता.
रात्री नऊला मात्र तो फ्री झाला व त्याने खुर्चीवरच दोन मिनिटे डोळे मिटले.त्याला खुप आश्चर्य वाटलं कारण डोळे मिटल्यावर स्वत:शीच हसणारी मुक्ता त्याच्या डोळ्यासमोर आली.ह्या मुलीने मनात घर केलयं असं वाटलं.त्याने तिला मेसेज करायला फोन उचलला.डिपी बदलेला दिसत होता.त्यात एक वाक्य होतं,
"दाटलेल्या भावना सारया
कळणार त्या कश्या कोणाला...
कधी जाणता कधी अजाणता
येतो पुर मग भावनेला..."
हे वाचुन तिचा मुड कसा आहे ह्याचा त्याला अंदाज येत होता.
त्याने मेसेज केला व तेवढ्यात डाँ.पुर्वा आली.निघायची वेळ झाली हे लक्षात येऊन तो लगेच म्हणाला,"हो चल निघुयात..."
ती मनापासुन हसली,"तेच सांगायला आले होते सर,आज सागर आलाय घ्यायला...मी त्याच्यासोबत जाते...पण तुम्ही पण लगेच निघा...जास्त वेळ थांबु नका..."असे म्हणुन बाय करुन ती निघुन गेली.
पुर्वा गेली आणि अभिषेकला वाटलं की किती सवय होते ना आपल्याला एकामेकांची.आपण आज हे मुक्तासोबतचे बोलणे पुर्वाला सांगणार होतो पण ती गेली.खरंतर त्याला विशेष काही सांगायचे नव्हते तरी आपल्या मनातले ऐकायला कोणी नाहिये हे पचायला खुप जड जाते ह्याची त्याला जाणीव झाली.त्याने पुन्हा काही मेसेज आलाय का बघायला फोन चेक केला.तिचा काही रिप्लाय नव्हता.फोन बंद करुन तोही घरी जायला निघाला.
घरी आल्यावर मात्र दिवसभर दगदग झाल्यामुळे त्याला थकवा जाणवत होता.बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप लागली.सगळे विचार बाजुला झाले होते.
नंतरचे दोन दिवस त्याने मेसेज केला तरी तिचा काहीच रिप्लाय  नव्हता.कामाच्या नादातही तो हे विसरु शकत नव्हता.तिसरया अभिषेकने तिला फोन केला तर बंद आहे असे येत होते.नेमकं काय झालं असेल,तो हा विचार करत असताना त्याने पुर्वाला बोलावले.
तिला सगळं सांगुन त्याने काय करावे विचारलं.पुर्वाने सुचवलं की डाँ.दिवाणांशी बोलुन घ्या ना.पुर्वाला हो बघतो म्हणाला तरी  त्याला कुठेतरी आतुन डाँ.दिवाणांशी बोलावेसे वाटले नाही.त्यामुळे आता काय करावे हा विचार करत होता.संध्याकाळी एक पेशंट चांगला बरा झाला म्हणुन त्याचे नातेवाईक त्याला घेऊन आले.पण सर बिझी आहे,नाव नोंदविल्याशिवाय भेटता येणार नाही असे सांगुन रिसेप्शनवरुन त्यांना परत पाठवत होते.बाहेर काय गोंधळ आहे हे विचारायला काँल केला तर त्याला नर्सने सांगितले.त्याने त्यांना पाठवुन दे असं सांगितलं.पेशंटच्या नातेवाईकांनी मिठाई देऊन आभार मानले,"तुमच्याकडे येणारा प्रत्येक पेशंट बराच होतो,हे ऐकुन होतो आणि ते खरं ठरलं.तुमचे खुप उपकार आहेत..." हे ऐकुन प्रत्येक पेशंट म्हणल्या बरोबर त्याच्या डोक्यात मुक्ताचा चेहरा आला व तो अस्वस्थ झाला.त्याने त्यांना नमस्कार केला व ते लोक गेल्यावर त्याने तिला काँल केला.फोन बंद होता.पुढचा पेशंट आला म्हणुन तो त्यामधे बिझी झाला.
आज सहावा दिवस झाला मुक्ताचा काहीही काँन्टँक्ट नव्हता.त्यामुळे न रहावुन त्याने डाँ.दिवाणांना काँल केला.त्यांना तर काहीही कल्पना नव्हती.ते विचारुन सांगतो म्हणाले.
अभिषेकने विचार केला की जीवनात काही कहाण्या अर्धवटच राहुन जातात,त्यातलाच एक भाग समजुन हा विषय सोडुन द्यावा.रविवारची संध्याकाळ अश्या विचारात घालवणे त्याला अवघड वाटत होते.म्हणुन तो चौपाटीवर चक्कर मारायला निघाला.आज कोणीच सोबत असावं असं वाटत नव्हतं त्याला...अगदी मित्र सुध्दा..
किनारयापर्यंत उसळणारया पाण्याच्या लाटा बघुन भरतीची कल्पना येत होती.
"आयुष्यात अनेकदा अश्या लाटा येतात व  जमीनीवर ओलावा निर्माण करुन जातात,मागे सोडुन जातात त्या फक्त खुणा आणि आठवणी..."असा विचार करत तो हातातल्या काडीने वाळुमधे अक्षर काढत होता.तेवढ्यात आवाज आला,"एम मुक्ताचा पण होतो डाँक्टर..."
त्याने झटक्यात वळुन पाहिले तर मुक्ता उभी होती.त्याला एकदम भरुन आले.तो तिच्याकडे पहात रागात म्हणाला,"एम फाँर मँडचा पण असतं..."
ती एकदम मनापासुन हसली.त्याला अजुन राग आला.त्याने सरळ रागात तिच्याकडे पहात विचारले,"कुठे होतीस तु इतके दिवस? काहीच संबंध नाही,काय अर्थ आहे ह्या वागण्याला?"
त्याचा तो राग पाहुन तिला जरा बरं वाटलं.कोणी तरी विचारणार आहे हे पाहुन...
"अशी अचानक गायब होतेस काय,वाटेल तेव्हा येतेस काय...तुला काय वाटलं की तुझ्या मनात येईल तसं वागता येईल काय..."तो खुप चिडुन बोलत होता.
ती शांतपणे खाली बघत होती.तो शांत झाला व उसळत्या लाटांकडे पाहु लागला.
ते पाहुन ती म्हणाली,"साँरी...मनापासुन..."
त्याने तिच्या हातावर हात ठेवला,"साँरी...मी पण खुप चिडलो..सहसा मी चिडत नाही पण गेले सहा दिवस तुझा काहीच पत्ता नाहिये म्हणुन...साँरी..."तो म्हणाला.
ती गप्पच होती.
न रहावुन तोच म्हणाला,"तु इथे कशी काय आलीस?.."
ती फक्त हसली.
ते पाहुन त्याने लगेच विचारलं,"काही चुकीच विचारलं का मी?हसु नकोस,तुला मी विचारलं होत की तु मलाच का सांगितलंस हे सगळं..."
नकारार्थी मान हलवत ती लगेच नाही म्हणाली.मग त्याने भुवया उचलत मग काय कारण असे विचारले.
मुक्ता बोलु लागली,"तुमचा प्रश्न बरोबर आहे.मी तुम्हालाच का सांगते आहे हे सगळं....काही कारणं आहेत..."असं म्हणत ती त्याच्या बाजुला येऊन बसली.
"खरंतर मी एक पोलिस अधिकारी असुनही अश्याप्रकारे अडकले गेले ह्याचे दु:ख,कुठेतरी ह्या सगळ्या सिस्टिमविषयीची चिड,अन्याय सहन करावा लागताेय म्हणुन येणारा संताप व हेल्पलेस फिलिंगमुळे खुप नैराश्य आले होते.कोणाशीच संवाद नकोसा झाला होता.प्रत्येक जण एक केस म्हणुन ट्रिट करत होता आणि आता कुठल्याही प्रकारे काम करायचे नाहिये म्हणुन मी मौनव्रत घेतले होते.
त्यातच जेव्हा तुमच्याकडे आले,तेव्हा तुमच्या डोळ्यात कुठेतरी मला आपलेपण दिसलं,वाटलं की तुम्ही ऐकुन घ्यालं व मलाही हे सगळं सांगुन मोकळं व्हावसं वाटत होतं...तुमच्यामुळे मला कुठेतरी जगण्याची इच्छा होत होती,मागच सगळं विसरुन पुढे नवीन आयुष्य जगावं असं वाटत होतं पण आपण मागच्या आठवड्यात शेवटचे बोललो आणि मला कळलं की माझ्याविरुध्द केस केलीये धनंजयने...माझ्यात लढायची ताकद नाहिये आता आणि मरण्याची हिंमत होत नाहिये...गेले सहा दिवस मी इथे रोज येत आहे आणि मरण्याची हिंमत जोडायचा प्रयत्न करत आहे...मला मरायचं आहे...बसं..."तिचे बोलणे संपते तोवर अभिषेकने जोरदार थोबाडीत मारली तिच्या आणि ती भानावर आली...
आज हा सगळा भुतकाळ अभिषेकच्या डोळ्यासमोरुन गेला.अभिषेकचा राग पाहुन तिला खुप आश्चर्य वाटलं.तेवढ्यात अभिषेकने," साँरी...खरंच मला माफ कर...पण तुला सत्यात आणण्यासाठी ते आवश्यक होते...साँरी..."असे म्हणत अभिषेकने तिला जवळ घेतले.तिने अश्रुंना वाट करुन दिली....
"अाता तु फक्त लढायचं आहेस...मी तुझ्यासोबत आहे...मरतात ती भ्याड लोक असतात...मरणासाठी लागणारी हिंमत अन्यायाविरुध्द लढताना वापरायची...कळलं ?"असे म्हणत त्याने तिचे डोळे पुसले व तो पुढचा विचार करु लागला...

-क्रमश:

© प्राजक्ता रुद्रवार

Comments

Popular posts from this blog

त्या वळणावर - भाग 8

त्या वळणावर - भाग #1